अंकुर

होतंय काय आपण चमत्काराचे भक्त असतो. चमत्कार होईल ही येडी आस आपल्याला पार तल्लीन करुन टाकते.

पण आयुष्य म्हणावं तितकं नाटकीय किंवा ड्रॅमाटिक नसतंच कधी. म्हंजे आभाळातून थाॅर येतो आणि लगेच अवेंजर जिंकायला लागतात असं होतच नाही, बहुतेकदा. मुळात हा फिल्मीपणा फार घातकी आहे.

सर्वांचं आयुष्य वरच्या टप्प्यात सुरु होत नाही. इथे तर पहिलं हे स्पष्ट करावं वाटतं की ‘there is nothing fair in this world’ . हाही एक जबरदस्त काटा आहे – तुलना. त्याबद्दल कधीतरी नंतर.

तर बऱ्याच लोकांसाठी प्रवास हा चढताच असतो. संघर्ष असतो. तो चालूच राहतो. हळूहळू लोक एकेक टप्पा पार पाडतात आणि वर जाऊ लागतात. पण हे अर्थात सगळ्यांसाठी नाही.

पहिला पराभव होतो. एक खीळ बसते. बस! सगळं कोलमोडू लागतं. आणि आपण एका उजाड माळरानावर पोहचतो जिथे सगळं काही भकास आहे.

तिथून चालत चालत पुन्हा दुतर्फा हिरवीगार झाड असणाऱ्या रस्त्याकडे तर यायचं असतं. बस साधं सोपं आहे की नाही. पण आपण त्या माळरानावर जेव्हा पोहचतो तेव्हा त्याला परतीचा रस्ता नसतो. म्हंजे रात्री तुम्ही कुठेतरी दुसरीकडे झोपलेले असता आणि जाग येते तेव्हा या माळरानावर. इतक्या झटकन की आपल्याला समजतच नाही बराच वेळ की काय चालू आहे ते!!

लक्षात आलं की समजतं चारी बाजूंनी फक्त भेगाळलेल्या जमिनीने वेढा घातलाय. दूरदूर पर्यंत चिटपाखरू नाही.

मग आपल्याला वाटतं की चमत्कार व्हावा. कुणी तरी आपल्याला शोधत यावं. नाहीतर या भेगा मिटून वाट तयार व्हावी. भेगांतून अंकुर फुटावे आणि बघता बघता त्यांची हिरवीगार झाडी व्हावीत. पण असं होतं का?


आपल्याला खूप खूप वाटतं, आजूबाजूची परिस्थिती बदलावी. माणसं बदलावी. कुणीतरी यावं आणि आपल्याला घेऊन जावं. पण नाही होत.
इथे अजिबातच चमत्कार होणार नाही असंही नाही पण त्याची शक्यता असेल तरी कितीशी?

मग काय राहतो उपाय? अर्थात आपल्याला आपली वाट शोधायची आहेच. पण त्यासाठी मन बदलायला हवं.

मन कसं बदलतं?

एक म्हंजे जाणीव आणि दुसरं म्हंजे अनुभव.

अनुभव फार कठीण मार्ग आहे मन बदलण्याचा. त्यात काय काय किती किती सहन करावं लागतं याचा आपल्याला असा कितीसा अंदाज असतो. पण अनुभवांती बदललेलं मन अनाहूतचं असतं नै? मुळात आपण अनुभव निवडत नसतोच कधी. एकदा निर्णय घेतला की त्यानंतर जे परिणाम येतात त्यातला एक अनुभव.

अनुभव माणसाला (पर्यायाने त्याच्या मनाला) अनाहूतपणे बदलतो.

जाणीव देखील काही अंशी अनाहूतच म्हणता येईल. पण त्यात कधीकधी आपल्याला स्वतःहून मन बदलायचं असतं. मग आपण त्यासाठी प्रयत्न करतो. वाचतो, ऐकतो, चर्चा करतो. त्यांती बदल होतो. अगदी ठरवल्याप्रमाणे.

पण अनाहूत अचानक जाणीव देखील असतेच. हे कदाचित नाटकीय असू शकतं चमत्कारिक नसलं तरी.

हे तेव्हाच होतं जेव्हा आपण भावनेत असतो. आपल्या मनाची स्थिती त्या पाण्यात पोहण्याचा आकांताने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीसारखी असते. मला पोहायचय. काहीही झालं तरी.

एक दिवस येतो. एक क्षण येतो. जेव्हा जाणीव होते.

बापाची एक नजर.
आईची पाठीवर पडलेली एक थाप.
आपल्या प्रिय व्यक्तीने बोललेले दोन शब्द. जे तुम्ही हजार वेळा ऐकले असतील. वाचले असतील. युट्यूबवर-इंन्स्टावर-ट्विटरवर. अगदी कुठल्या मोटिवेशनल स्पीकर कडून. पण ते दोन शब्दांनी आपली आतली अख्खी सिस्टम तेव्हाच अॅक्टीव्हेट होते, ट्रिगर होते, क्लिक होते जेव्हा ती व्यक्ती बोलते. It’s almost like a password to our mind. ती दोन शब्द बोलणारी व्यक्ती. नजर टाकणारा बाप. थाप टाकणारी आई.

All we need is a word from loved ones.

बोलायला पाहिजे ह्या लोकांशी. असं नाही की बोललं की लगेच जाणीव ट्रिगर होईल. पण संवाद सुरू करायला पाहिजे. पोहायच असेल तर पाण्यात पडायला नको का? एक क्षण एक वाक्य एक शब्द नक्की असा येईल की सगळं मरगळ झटकन जाईल आणि तुम्हाला थोडा का होईना उत्साह वाटेल. त्या भेगाळलेल्या माळरानावरील जमिनीत बीजारोपण होईल.

अंकुर फुटेल.
बघता बघता त्यांची झाडी होईल.
मग त्याच्या कडेकडेने जाऊ लागलं की आपोआप पाऊलवाट फुटत जाईल. अर्थात, कदाचित.

@परिक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s